परिचय
कँडलस्टिक चार्ट हे आधुनिक ट्रेडिंगचे मूलस्तंभ आहेत, तुम्ही अनुभवी ट्रेडर असो किंवा ट्रेडिंग क्षेत्रात पहिल्यांदा पाऊल टाकत असाल, तर तुम्हाला विविध प्रकारच्या कँडलस्टिक्स समजून घेणे महत्त्वाचे आहे. हे विशेष चार्ट नमुने फक्त बाजारातील ट्रेंडच प्रकाशझोतावर आणत नाहीत तर माहितीपूर्ण ट्रेडिंग निर्णय घेण्यासाठी विश्वासार्ह निदर्शक म्हणूनही काम करतात. या लेखात, आपण विविध प्रकारच्या कँडलस्टिक्सवर दृष्टिक्षेप टाकू आणि ते कसे वापरायचे याबद्दल माहिती घेऊ जेणेकरून आपण आत्मविश्वास आणि अचूकतेने ट्रेडिंगच्या गुंतागुंतीच्या जगात प्रवास करू शकाल. कँडलस्टिक चार्ट हे ट्रेडिंगमध्ये सर्वाधिक वापरले जाणारे साधन आहेत. हे आर्थिक बाजारपेठेतील किंमतीच्या हालचालींबद्दल मार्गदर्शन करताना अत्यंत अचूकतेने मदत करतात. या कोर्स च्या दुसऱ्या भागात आपण बघणार आहोत कॅन्डलस्टिकस चे पॅटर्न आणि प्रकार (All CandleStick Patterns) आता आपण विविध प्रकारच्या कँडलस्टिक्सबद्दल आणि त्यांच्या अर्थाबद्दल माहिती घेऊ या.
तांत्रिक विश्लेषणामध्ये कँडलस्टिक्स का महत्त्वाचे आहेत:
- विजुअल रिटेंशन (Visual Retention):
- कँडलस्टिक चार्ट्स दृश्यात अप्रतिम आणि सोप्या रितीने किंमतींची हालचाल दाखवतात. त्यांच्यामुळे ट्रेडर्सना वेगाने आणि सोप्या रितीने बाजारातील ट्रेंड आणि पॅटर्न समजून घेता येतात.
- ट्रेंड ओळखणे (Identifying Trends):
- कँडलस्टिक चार्ट्समधून उपयुक्त माहिती मिळते जी बाजाराचे ट्रेंड ओळखायला मदत करते. बाजारातील तेजीचे आणि मंदीचे ट्रेंड समजण्याकरिता हे चार्ट्स अत्यंत उपयोगी आहेत.
- मार्केट सेंटिमेंट (Market Sentiment):
- कँडलस्टिक्समुळे व्यापाऱ्यांना बाजारातील भावना ओळखायला मदत होते. प्रत्येक कँडलस्टिकच्या आधारे बाजारातील भावना, खरेदी आणि विक्रीचा दबाव कसा आहे हे स्पष्ट होते.
- व्यापार निर्णय (Trading Decisions):
- कँडलस्टिक पॅटर्नचा अभ्यास करुन व्यापाऱ्यांना त्वरित आणि माहितीपूर्ण ट्रेडचे निर्णय घेता येतात. हे चार्ट्स ट्रेडर्सना योजना आखण्यास आणि धोरणे ठरविण्यास मदत करतात.
- सखोल विश्लेषण (In-Depth Analysis):
- कँडलस्टिक चार्ट्सच्या मदतीने ट्रेडर्स सखोल विश्लेषण करु शकतात. विविध पॅटर्न, सिग्नल्स आणि गतींच्या निरीक्षणाद्वारे व्यापाऱ्यांना अधिक सखोल माहिती मिळते.
कँडलस्टिक चार्ट्सच्या अभ्यासामुळे ट्रेडर्सना बाजाराच्या गती, ट्रेंड्स आणि संभाव्यता यांचा समज अधिक चांगला होतो. म्हणूनच, तांत्रिक विश्लेषणामध्ये कँडलस्टिक्सची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे.
कँडलस्टिक ची रचना (CandleStick)
कँडलस्टिक म्हणजे आर्थिक बाजारातील किंमतीच्या हालचालींना दर्शविणारे एक प्रकारचे चार्ट आहे. प्रत्येक कँडल बाजारातील एका विशिष्ट कालावधीतील किंमतीच्या हालचालींचे प्रतिनिधित्व करते. प्रत्येक कँडलची रचना चार प्रमुख घटकांवर आधारित असते : ओपन (Open), हाय (High) , लो (Low) आणि क्लोज (Close).
सर्वात आधी आपण समजून घेऊया कि एक कँडलस्टिक कशी बनलेली असते :

वरील चित्रामध्ये दाखवल्याप्रमाणे एक कँडलस्टिक एका विशिष्ट काळासाठी एका शेअर चा किंवा सिक्युरिटी ची ओपनिंग प्राईस ,जास्तीत जास्त वर गेलेली प्राईस, आणि कमीत कमी झालेली प्राईस आणि बंद होत असतानाची प्राईस दर्शवते. हे सर्व बदल त्या कालावधी पुरते मर्यादित असतात.
कँडलस्टिक दोन प्रकारच्या असतात वर दाखवल्या प्रमाणे बुलिश आणि बेअरिश.
- बुलिश कँडल (Bullish CandleStick) : जर ओपनिंग प्राईस पेक्षा बंद होत असतानाची प्राईस अधिक असेल तर ती कँडलस्टिक बुलिश मानली जाते अशा कँडलस्टिकची रिअल बॉडी हि हिरवा किंवा पांढऱ्या रंगाने दर्शवली जाते. अशी कँडल भाव वाढण्याचा संकेत देऊ शकते.
- बेअरिश कँडल (Bearish CandleStick): बुलिश कॅन्डल उलट जर ओपनिंग प्राईस पेक्षा बंद होत असतानाची प्राईस कमी असेल तर ती कॅन्डल बेअरिश मानली जाते.अशा कॅन्डलस्टिक ची रिअल बॉडी हि लाल किंवा काळ्या रंगाने दर्शवली जाते अशी कॅन्डल भाव घसरण्याचा संकेत देऊ शकते .
- अपर शॅडो (Upper Shadow): अपर शॅडो हि रिअल बॉडीच्या वरच्या दिशेने बनलेली एक रेष असते जी आपल्याला त्या विशिष्ट कालावधीमध्ये भाव जास्तीत जास्त किती वर जाऊ शकला याची माहिती देते.
- बॉडी (Body) : बॉडी हा कॅन्डलचा सर्वात मोठा भाग आहे.जो ओपनिंग आणि क्लोसिंग प्राईस मधील फरक दाखवतो,पूर्णपणे बनल्यानंतर ज्या कॅन्डलची बॉडी हि हिरव्या किंवा पांढऱ्या रंगाची असेल तर भाव वारगेलेला असतो आणि ज्या कॅन्डलची बॉडी लाल किंवा काळ्या रंगानी बनलेली असेल तेव्हा भाव खाली आलेला आहे असे आपण समजू शकतो.
- लोअर शॅडो (Lower Shadow): त्याचप्रमाणे लोअर शॅडो हि रिअल बॉडीच्या खालच्या दिशेने बनलेली एक रेष असते जी आपल्याला त्या विशिष्ट कालावधीमध्ये भाव जास्तीत जास्त किती खाली गेला याची माहिती देते.
कॅन्डलस्टिक चे प्रकार
आता आपण बघूया कॅन्डलस्टिकस चे प्रकार, तसे कॅन्डलस्टिक पॅटर्न मध्ये तुम्हाला बरेचसे प्रकार बघायला मिळतील पण आज आपण सर्वाधिक अभ्यास केले जाणारे आणि चार्ट्स मध्ये वारंवार दिसून येणाऱ्या काही चार्ट पॅटर्न बद्दल माहिती देणार आहोत .
हॅमर (Hammer CandleStick):
हॅमर एक छोटी कॅन्डल आहे जी बनताना अशी बनते कि तिची अपर शॅडो खूप छोटी असते किंवा बनलेलीच नसते आणि खालच्या दिशेत लांब शॅडो बनलेली असते. उदा.,

महत्वाचे : सामान्यतः हि कॅन्डल अपट्रेंड पूर्ण होत असताना बनते. हा एक बुलिश पॅटर्न मानला जातो , हॅमर कॅन्डलमध्ये खालची शॅडो हि रिअल बॉडी पेक्षा कमीत कमी दोन ते अडीच पट लांब असायला हवी, कॅन्डल बनताना कुठल्याही रंगाची बनू शकते पण जर का पांढऱ्या किंवा हिरव्या रंगाची असेल तर अधिक चांगले मानले जाते.
इन्व्हर्टेड हॅमर (Inverted Hammer CandleStick):
हि कॅन्डल हॅमर च्या उलट दिशेने असते. ही बनताना वरच्या दिशेने लांब शॅडो असते आणि खालच्या दिशेला बॉडी आणि छोटी शॅडो असते.उदा.,

महत्वाचे : हि कॅन्डल डाउनट्रेंड पूर्ण होत असताना बनते. हॅमर सारखीच पण वरची शॅडो कमीत कमी दोन ते अडीच पट लांब असायला हवी. कॅन्डल बनताना पांढऱ्या किंवा हिरव्या रंगाची असेल तर उत्तम.
डोजी आणि त्याचे प्रकार (Doji CandleStick) :
जेव्हा बाजारात खरेदी आणि विक्री करणारे सामान असतात आणि एक अनिर्णायक स्थिती निर्माण होते तेव्हा डोजी कॅन्डल बनते.उदा.,

महत्वाचे : डोजीला अनिश्चिततेची निशाणी म्हणून सुद्धा ओळखले जाते. डोजीमध्ये ओपनिंग प्राईस आणि क्लोसिंग प्राईस मध्ये जास्त अंतर नसते, खरेदी करणारे आणि विक्री करणाऱ्यांमध्ये समानता दाखवण्याचे काम डोजी करते हा एक रिव्हर्सल चा संकेत आहे.
शॅडो च्या लांबीला अनुसरून डोजीला चार प्रकारात विभागले आहे :

- ड्रॅगनफ्लाय डोजी (Dragonfly CandleStick):
- इंग्रजी ( T ) सारखी दिसणारी हि कॅन्डल एक मजबूत तेजी दाखवणारी कॅन्डल आहे म्हणजेच डाउनट्रेंड संपून आता अपट्रेन्ड ची सुरुवात होऊ शकते.
- स्टँडर्ड डोजी (Standered Doji CandleStick) :
- ही कॅन्डलबेरीज च्या चिन्हासारखी ( + ) दिसते जी ट्रेंड संपताना वरच्या किंवा खालच्या बाजूने बनून येते आणि याला त्या क्षणापासून ट्रेंड रिव्हर्सल होण्याचे चिन्ह दिसून येतात .
- लॉन्ग लेगड डोजी (Long Legged Doji CandleStick) :
- ही कॅन्डल बनत असताना हिच्या वर आणि खाली दोन्ही बाजूस लांब शॅडो आणि शक्यतो सामान मापाच्या बनलेल्या असतात, अशा प्रकारची कॅन्डल ही मोठ्या प्रमाणात अनिश्चितता दर्शवते आणि लवकरच ट्रेंड फिरू शकतो याचे संकेत देते.
- ग्रेव्हस्टोन डोजी (Gravestone Doji CandleStick) :
- हा पॅटर्न ड्रॅगनफ्लाय डोजी च्या उलट आहे. ह्याचा अर्थ बाजारातील अनिश्चिततेचे प्रदर्शन आहे. ही पॅटर्न मुख्यत्वे एक उलट असणारा सिग्नल म्हणून मानला जातो, विशेषतः जर तो अपट्रेंडच्या अखेरीस दिसत असेल. याचा अर्थ व्यापारी किंवा गुंतवणूकदारांसाठी बाजारातील संभाव्य ट्रेंड बदलाचा संकेत म्हणून घेतला जाऊ शकतो.
मारूबोझू (Marubozu CandleStick):
यात आपण बुलिश आणि बेअरिश मारूबोझू दोन्ही प्रकार बघणार आहोत :

बुलिश : हा एक सिंगल कॅन्डल पॅटर्न आहे ज्याचा टेक्निकल ॲनालिसिसमध्ये प्राईस मध्ये तेजी चा अंदाज घेण्यासाठी वापर केला जातो .बुलिश मारूबोझू हि लांब आणि हिरव्या किंवा पांढऱ्या रंगामध्ये बनलेली असते हिला कुठल्याही बाजूस शॅडो नसते हि कॅन्डलतेजीचा एक मजबूत संकेत समजली जाते.
बेअरिश मारूबोझू : बुलिश मारूबोझू प्रमाणेच हि कॅन्डल उलट दिशेने बनलेली असते जिचा रंग लाल किंवा काळ्या रंगाचा असतो. ह्या कॅन्डलचा उपयोग मंदीचा अंदाज घेण्यासाठी केला जातो तसेच हि कॅन्डल मंदीचा एक मजबूत संकेत सुद्धा मानली जाते.
स्टार कॅण्डल्स (Star Candlestick Pattern) :

- मॉर्निंग स्टार (Morning Star CandleStick):
- हि कॅन्डलएक तेजीचा संकेत देणारी कॅन्डल आहे. जेव्हा डाउनट्रेंड सुरु असतो तेच यात चालू असलेल्या डाउनट्रेंड मध्ये हि कॅन्डल बनते यानंतर कन्फर्मेशन मिळण्यानंतर ठरवले जाऊ शकते कि अपट्रेन्ड सुरु होणार आहे .
- इव्हनिंग स्टार (Evening Star CandleStick):
- हि कॅन्डल मंदीचा संकेत देणारी कॅन्डल आहे. यामध्ये पहिली कॅन्डल ही अपट्रेन्ड सोबत येणारी कॅन्डल आहे. त्यानंतरची कॅन्डलखूप कमी बदलाने खुलून बंद होते हीचा भाव आधीच्या कॅन्डलपेक्षा कधी ही जास्तच असतो दोन्ही कॅन्डल नंतर जी कॅन्डल बनत असते ती कॅन्डल मोठ्या प्रमाणात घट नोंदवते .याच पॅटर्न च्या मदतीने आपण येणाऱ्या मंदीचा आधीच अंदाज घेऊ शकतो.
- शूटिंग स्टार (Shooting Star CandleStick):
- ह्या कॅन्डलचा उपयोग रिव्हर्सल चा संकेत घेण्यासाठी केला जातो . ही एक लहान कॅन्डल असते, जीची अपर शॅडो रिअल बॉडी पेक्षा दुप्पट लांब असते. ही कॅन्डलकुठल्या हि रंगाची बनू शकते पण जर लाल किंवा काळी कॅन्डल बनत असेल तर हा एक डाउनट्रेंड साठी मजबूत संकेत मानला जाऊ शकतो.
हँगिंग मॅन (Hanging Man Candlestick Pattern): हँगिंग मॅन ह्या प्रकार मध्ये ही एक अशी कॅन्डल असते जीची रिअल बॉडी खूप लहान असते. त्यासोबतच वरच्या बाजूस लहान शॅडो असते किंवा नसू शकते. पण खालच्या बाजूस दुप्पट पेक्षा जास्त लांब शॅडो बघायला मिळते. ही कॅन्डल अपट्रेन्ड संपत असताना तयार होत असते इथून समजावे कि, खरेदी करणाऱ्यांपेक्षा आता विक्री करणाऱ्या ट्रेडर्स ची पकड मजबूत होत आहे. म्हणूनच याला बेअरिश रिव्हर्सल पॅटर्न देखील म्हंटले जाते.

पिअर्सिंग लाईन (Piercing Line candlestick pattern) : हे एक ट्रेंड रिव्हर्सल पॅटर्न आहे, जे डाउनट्रेंड संपून अपट्रेंडच्या सुरुवातीचा संकेत देतात. या पॅटर्न मध्ये पहिल्या दिवशी एक लांब मंदीची म्हणजेच लाल कॅन्डलअसते आणि दुसऱ्या दिवशी हिरवी म्हणजेच तेजीची कॅन्डल तयार होते. दुसऱ्या दिवशी भाव खूप खाली खुलतो आणि बंद भाव अगोदरच्या दिवशीच्या कॅन्डलच्या मध्यभागापेक्षा थोडा वर येतो जे आपण खाली दिलेल्या चित्रात पाहू शकतो अशा प्रकारच्या कॅन्डल जेव्हा बघायला मिळतात तेव्हा आपण भाव वर जाणार असे समजू शकतो. कन्फर्मेशन साठी आपण तिसऱ्या कॅन्डलची वाट बघू शकतो.

डार्क क्लाऊड कव्हर (Dark Cloud Cover Candlestick pattern): हे एक ट्रेंड रिव्हर्सल पॅटर्न आहे. हे आपल्याला तेजीचा अंत आणि मंदीची सुरुवात होत आहे असा संकेत देऊ शकते. या पॅटर्न मध्ये पहिल्या दिवशी एक हिरवी कॅन्डलबनते आणि दुसऱ्या दिवशी भाव कमी होऊन एक मोठी लाल कॅन्डलतयार होते दुसऱ्या दिवशीची ओपनिंग प्राईस पहिल्या दिवसाच्या हाय प्राईस पेक्षा वर असतो आणि बंद होणारा भाव हा हिरव्या कॅन्डलच्या मध्यभागापेक्षा खाली असतो. जेव्हा अश्या प्रकारच्या कॅन्डलची रचना होते तेव्हा विक्रीचे ट्रेड आपण घेण्यास हरकत नाही आणि कन्फर्मेशन मिळाल्यानंतर आपण विक्री केली पाहिजे.

बुलिश एग्लफिंग पॅटर्न (Bullish Engulfing CandleStick Pattern):हे एक ट्रेंड रिव्हर्सल पॅटर्न आहे. हे मंदीचा अंत आणि तेजीच्या सुवातीचा संकेत देणारी कॅन्डल आहे. या पॅटर्न मध्ये पहिल्या दिवशी एका लहान लाल कॅन्डलची रचना होते जी मंदीला अनुसरूनच बनलेली असते. त्यानंतर तिला पूर्णपणे कव्हर करणारी एक मोठी हिरवी कॅन्डलतयार होते. लांब हिरवी कॅन्डल बनण्याचा अर्थच असा होतो कि खरेदी करणारे हे विक्री करणाऱ्यांवर पूर्णपणे वरचढ होत आहेत आणि ट्रेंड रिव्हर्सल होण्याच्या दिशेने आहे. तसेच तिसऱ्या दिवशी सुद्धा जर तेजी चा संकेत कनफर्मेशन देत असेल तर तेजी सोबत जाण्यास हरकत नाही.

बेअरिश एग्लफिंग पॅटर्न (Bearish Engulfing CandleStick Pattern): हे सुद्धा एक ट्रेंड रिव्हर्सल पॅटर्न आहे हे संकेत देते कि आता तेजीचा अंत होऊन मंदीची सुरुवात होईल. या मध्ये पहिल्या दिवशी तेजीची लहान हिरवी कॅन्डल तयार होताना दिसते. दुसऱ्या दिवशी मंदीची लाल आणि लांब कॅन्डल तयार होते. जी अगोदरच्या दिवशीच्या कॅन्डलला पूर्णपणे कव्हर करते लांब आणि लाल कॅन्डलचा अर्थ असा होतो की मजबूत ट्रेंड रिव्हर्सल होत आहे. जेव्हा अश्या कॅन्डलची रचना होते तेव्हा विक्रीसाठी तयार राहायला हवे.

“वर दिल्या गेलेल्या सर्व कॅन्डलस्टिकस ह्या तुम्हाला लाईव्ह चार्ट्स मध्ये सुद्धा बघता येतील त्यासाठी येथे क्लिक करा . 👈“
निष्कर्ष
कॅन्डलस्टिक पॅटर्न समजणे तांत्रिक विश्लेषणावर आधारित निर्णय घेण्यासाठी प्रत्येक ट्रेडरसाठी आवश्यक आहे. वेगवेगळ्या प्रकारचे कॅन्डलस्टिक्स आणि पॅटर्न ओळखणे बाजारातील भावना समजण्यात आणि संभाव्य किमतीच्या हालचालींचा अंदाज लावण्यात मदत करू शकते. तसेच, यशस्वी ट्रेडिंगसाठी हे साधने इतर विश्लेषण पद्धती आणि जोखीम व्यवस्थापन धोरणांसह एकत्र करणे महत्त्वाचे आहे. सातत्यपूर्ण शिक्षण आणि सराव दररोजच्या ट्रेडिंग मध्ये कॅन्डलस्टिक पॅटर्न आत्मविश्वासाने लागू करण्यासाठी महत्त्वाचे आहे.
कॅन्डलस्टिक पॅटर्न बद्दल वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQs):
- कॅन्डलस्टिक म्हणजे काय?
- कॅन्डलस्टिक्स हे तांत्रिक विश्लेषणात वापरले जाणारे एक प्रकारचे चार्ट आहे, जे एका विशिष्ट कालावधीतील किंमतींच्या हालचाली दर्शविते. प्रत्येक कॅन्डलस्टिक ओपन, हाय, लो आणि क्लोज किंमती दाखवतो.
- कॅन्डलस्टिक पॅटर्न का महत्त्वाचे आहेत?
- कॅन्डलस्टिक पॅटर्न व्यापाऱ्यांना संभाव्य बाजारातील ट्रेंड्स आणि उलट्या ओळखण्यात मदत करतात, जे बाजारातील भावना समजून घेण्यास मदत करतात आणि निर्णय घेण्यासाठी मार्गदर्शन करतात.
- नवशिक्यांसाठी कॅन्डलस्टिक पॅटर्न प्रभावी ठरू शकतात का?
- होय, नवशिके कॅन्डलस्टिक पॅटर्न शिकू शकतात आणि वापरू शकतात, परंतु त्यांना इतर तांत्रिक विश्लेषण साधनांसह जोडणे आणि वास्तविक भांडवलासह व्यापार करण्यापूर्वी विस्तृत सराव करणे सुचवले गेलेले आहे.
- सर्वात सामान्य कॅन्डलस्टिक पॅटर्न कोणते आहेत?
- सर्वात सामान्य पॅटर्नमध्ये डोजी, हॅमर, शूटिंग स्टार, एन्गल्फिंग, आणि मॉर्निंग स्टार यांचा समावेश आहे.
- बाजाराच्या ट्रेंडचा अंदाज लावण्यासाठी कॅन्डलस्टिक पॅटर्न विश्वासार्ह आहेत का?
- कॅन्डलस्टिक पॅटर्न संभाव्य ट्रेंड ओळखण्यात मदत करू शकतात, परंतु ते पूर्णपणे खात्रीशीर नाहीत आणि त्यांचा इतर निर्देशक आणि जोखीम व्यवस्थापन तंत्रांसह वापर केला पाहिजे.
- कॅन्डलस्टिक पॅटर्न सर्व प्रकारच्या व्यापारासाठी वापरले जाऊ शकतात का?
- होय, कॅन्डलस्टिक पॅटर्न विविध व्यापार प्रकारांसाठी लागू केले जाऊ शकतात, जसे की स्टॉक्स, फॉरेक्स, कमोडिटीस, आणि क्रिप्टोकरन्सी.
“टेक्निकल ॲनालिसिस कोर्स मधील भाग – 2 आपल्याला आवडला असल्यास शेअर करायला विसरू नका .. आणि पुढील भागासाठी येथे क्लिक करा .👈 “